स्वच्छ भारत अभियान आणि माझी शाळा
                    देश दिला मी तुझ्याच हाती,
                   
तुच तयाचा भाग्यविधाता.
                   
स्वच्छ सुंदर स्वर्ग बनव मजला,
                   
घाणीच्या नरकात घुसमटले आता.

ही घुसमट आहे माझ्या भारतमातेची , अस्वच्छतेच्या विळख्यात गुदमरलेल्या ,मानवी हव्यासाची बळी ठरलेल्या ,आपल्या सुंदर शरीराची धुळधाण स्वतःच्या डोळ्यांनी पाहणा-या हतबल भारतमातेची . म्हणूनच शाळा कॉलेजातील विद्यार्थ्यांना ती विनंती करते कारण तिला खात्री आहे माझी हीच लेकरं माझं कल्याण करतील. त्यामुळे शाळांची , शिक्षकांची जबाबदारी अधोरेखित होते.

खरंच सारं आपल्या हातात तर आहे .भारतासारख्या संस्कृतीचा टेंबा मिरवणा-या देशात लोकसंख्येच्या पुरामुळे अस्वच्छतेचा महापूर आलाय,भूकंप झालाय, ज्वालामुखीचा उद्रेक झालाय ,जी विशेषणं द्याल ती लागू पडतील या अस्वच्छतेच्या भस्मासुराला ! त्याला संपूर्ण थांबवणे शक्य नसेलही कदाचीत मात्र त्यासाठी महत्तम प्रयत्न करायला हवेत. या भगीरथ प्रयत्नांना प्रत्यक्षात आणण्याचे सामर्थ्य फक्त शाळांमध्येच आहे . म्हणूनच आमचे लाडके पंतप्रधान स्वच्छ भारत अभियानाची घोषणा करतात तेव्हा त्यात माझी, माझ्या शाळेची भूमिका काय ? हा विचार करणे हे क्रमप्राप्त आहे.

                   "भारत माझा देश आहे!" रोजच्या दिनक्रमातील या प्रतिज्ञेतील माझेपण आणि त्याबरोबर येणारी हक्क व कर्तव्ये याची विद्यार्थ्यांना जाणीव होणे अत्यंत आवश्यक आहे. या देशाच्या संपत्तीवर माझा हक्क आहे तसंच देश स्वच्छ सुंदर ठेवणं हे माझं कर्तव्य नाही का ? नक्कीच आद्यकर्तव्यांपैकी एक आहे हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे तितकेच महत्त्वाचे . यासाठी माझ्या शाळेतील शिक्षकांनीच पुढाकार घेवुन स्वतःपासून सुरूवात केली ,व्हरांड्यात दिसणारा कचरा , कागदाचे तुकडे शिक्षकच उचलायला लागल्यावर विद्यार्थी या प्रवाहात आपोआप खेचले गेले .  मा. मोदीजींच्या स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ म्हणून शाळेत "शुन्य कचरा मोहिम" सुरू केली,अर्थात यात १००℅ यश नक्कीच मिळालं नाही मात्र सुरूवात उत्तम.
                   

स्वच्छ भारत अभियान म्हणजे प्रत्येक भारतीयानं आपल्या स्वप्नातील सुंदर भारत प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेला एक मनस्वी प्रयत्न. महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त माझी शाळा राबवत असलेला उपक्रम खुपच सुंदर आहे .यात शाळा,शाळेचा परिसर-रस्ते स्वच्छतेच्या टप्प्यात येतातच याशिवाय परिसरातील मंदिरे, सार्वजनीक ठिकाणे विशेषत: नदीपरिसर  सारं स्वच्छ करून या मोहिमेत खारीचा वाटा उचलला जातो. हे सारं फक्त जयंतीपुरतं मर्यादित राहू नये यासाठी आपण केलेल्या सत्कार्याची आठवण देत त्यात सातत्य राहून ते जपले जावे यासाठी आठवड्याच्या दर सोमवारी एकत्रित परिपाठ घेतला जातो, उद्देश स्वच्छता विस्मरणात जाऊ नये. जनजागृतीचा हा सोहळा  विद्यार्थी-पालक-समाज-राष्ट्र अशा साखळीबंद संरचनेतून विकसित व्हावा अन् माझं राष्ट्र अतुल्य व्हावं हीच एक सर्वसाधारण शिक्षक म्हणून छोटीशी मनिषा. माझ्या शाळेचा आणखी एक स्तुत्य उपक्रम सांगण्याचा मोह आवरत नाही, पथनाट्य पथनाट्याच्या सहज सोप्या संवादातून स्वच्छतेचे महत्त्व आजुबाच्या गावात जाऊन पटवून सांगताना विद्यार्थ्यांमधील सामाजिक बांधिलकी सहज फुलते,बहरते आणि मग समाजजागृती पर्यायाने आलीच.

पाठ्यक्रमातून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करता करता वास्तवातील परीक्षांचे भान यावे यासाठी कच-याचे व्यवस्थापन यावरील शाळेतील विज्ञान शिक्षकांनी केलेला उपक्रम प्रशंसास्पद होता यात ओला व सुका कचरा याचे विभाजन ,त्याचे फायदे तसेच वस्तुंचा पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण यावर सविस्तर भाष्य केले. हात धुण्याच्या पध्दती यावर विद्यार्थ्यांनीच प्रात्यक्षिके सादर केली व भाष्यही..कारण वैयक्तिक स्वच्छता म्हणजे सामाजिक व देश स्वच्छतेचा  आरंभबिंदूच नाही का ?. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालीकेची डेंग्यू जनजागृती मोहीम शाळेत राबवली

परदेशातील स्वच्छतेचे ,सौंदर्याचे अखंड गोडवे गाताना त्यामागे तिथल्या लोकांची मेहनत,प्रगत मानसिकता ,विचारातील सखोलता याकडे सर्रास दुर्लक्ष करणारे संकुचित भारतीय आपण.. रस्त्यावर कचरा झाला म्हणून सरकारला दोष देत बसतो काहीही न करता. सरकारी  निधीतुन परदेशवा-या करून विचारमंथन करण्यात धन्यता मानणा-या कृतीशुन्य राज्यकर्त्यांमध्ये व आपल्यात फरक तो काय ? मी कचरा केला नाही मी तो उचलणार नाही या सो कॉल्ड स्वाभिमानी मानसिकतेत आता परिवर्तनाची गरज आहेत तरच देशाचा स्वभीमान टिकेल आणि स्वास्थ्यही . राष्ट्र स्वच्छतेची जबाबदारी माझीच या अविर्भावात प्रयत्न व्हायला हवेत मग मानसिकता क्या चिज है ! केल्याने होत आहे | ते आधी केलेचि पाहीजे || या उक्तीप्रमाणे सुरूवात केली की यश निश्चित. समुंदर भी एक एक बुँद सेही तो बनता है | यासाठी मी , माझे विद्यार्थी , माझी शाळा शक्य ते सारे यत्न करत राहू.

                देशाची प्रगती , श्रीमंती ही त्या देशातील कचरा-कुंड्यात असलेल्या कच-यावरून कळते यावरून आपण प्रगत नाही हे सत्य. येथे थुंकू नका असं लिहलेली पाटीच थुंकीने लालपिवळी झालेली असते, ही वृत्ती बदलायला हवी त्यासाठी स्वच्छता अगदी Door to Door जाऊन विकावी लागली तरी बेहत्तर . हा स्वच्छतेचा वसा जपता जपता  राजकारणातील , समाजकारणातील , अर्थकारणातील,  विचारातील अस्वच्छतेला  समुळ नष्ट करूया  यासाठी लागणारा  जोश- होश- परीपोष फक्त शाळांमध्येच आहे . मोदींच्या स्वप्नातील  Smart INDIA आणि डॉ.कलामांच्या स्वप्नातील सशक्त भारताकडे जाणारा मार्ग स्वच्छतेच्या वळणावरून जातो हे निश्चित. त्यासाठी आपण सारे एकसंध प्रयत्न करूया आणि भारताला पुनश्च सुंदर बनवू या . कारण आपल्या शाळा म्हणजेच देशाच्या विकासाचे खरे ब्रँड अँबेसिडर.