दुपारची १:३० ची वेळ.......गर्दीने खचाखच भरलेल्या अंबरनाथ ट्रेनमध्ये द्राविडी प्राणायाम करत एक फळविक्रेती शिरली. सगळ्यांच्या वैतागलेल्या नजरा झेलत ती पोटासाठी फळे विकत होती. एका महिलेने तिच्याकडून संत्री विकत घेतली. खाऊन झाल्यावर त्या संत्र्याच्या साली तिने स्वतःच्या पायापाशीच टाकून दिल्या. तेव्हा तिच्या समोरच बसलेल्या एका १० वर्षाच्या शाळकरी मुलीने तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला,आणि तिला म्हणाली "काकू उचला ती सालं, स्वतःच्या घरी पण तुम्ही असाच कचरा करता का?"
बस्स! हे शब्द मी ऐकले आणि विचारचक्र सुरु झाले,एवढीशी मुलगी पण खऱ्या अर्थाने स्वच्छता अभियानात सहभागी झाली,कारण तिच्या शाळेत हे अभियान यशस्वीपणे राबविले जात होते.
माझ्या मनात ही आले मग माझ्या शाळेत का नाही?
'नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण' माझी शाळा. शाळेची भव्य इमारत,विस्तीर्ण पटांगण. याच वास्तूमध्ये २०१२ मध्ये आम्ही एक उपक्रम सुरू केला. मधल्या सुट्टीत डबा खाल्ल्यानंतर विद्यार्थी खूप खरखटं करायचे. तेव्हा शाळेच्या पहिल्या मजल्यावर एक मोठा पिंप ठेवला व विद्यार्थ्यांना सांगितले,डबा खाल्ल्यानंतर जे खरकटं होतं ते या पिंपमध्ये टाकावे,एक गंमत आहे. सर्व विद्यार्थी रोज नेटाने खरखटं आणून टाकायचे. काही दिवसानंतर पिंपामध्ये उसाची चिपाडे व भाताचा तूस टाकला आणि तयार झाले एक उत्तम खत..... ते खत सर्व मुलांनी पटांगणीतील झाडांना दिले,किती आनंद मिळाला होता सर्व विद्यार्थ्यांना.......
मला असे वाटते की स्वच्छता अभियानाचे फलक लावून स्वच्छता होणार नाही तर अशा विविध उपक्रमातूनच होईल. याच अनुषंगाने माझ्या शाळेत विद्यार्थी संसद नेमली आहे. या समितीत स्वच्छता समिती आहे. ही समिती रोज वर्ग स्वच्छतेची जबाबदारी घेते.
भविष्यकाळात असे अनेक उपक्रम शाळेत राबवायचे आहेत.
● दिवसातून १० मिनिटं स्वच्छतेचा तास असेल,त्यावेळी विद्यार्थी वर्ग स्वच्छ करतील.
● आठवड्यातून एकदा सर्वात स्वच्छ व सुंदर वर्गाची घोषणा होईल.
● शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या वेळी या विषयावर नाट्य सादर करता येईल.
● शाळेच्या विज्ञान प्रदर्शनाला कचरा समस्येवर प्रकल्प सादर करता येईल.
● शारीरिक शिक्षणाच्या तासाला आठवड्यातून एकदा प्रत्येक वर्ग क्रीडांगण स्वच्छ करेल.
● विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट,स्वच्छता पुरस्कार मिळणाऱ्या गावांना नेता येईल.
● प्लास्टिक मुक्त शाळा अभियान राबवता येईल.
● स्वच्छता अभियानात प्रेरणा देणाऱ्या महनीय व्यक्तींची माहिती विद्यार्थ्यांना देता येईल.
● विज्ञानाच्या अभ्यासाद्वारे कंपोस्ट खतासारखे प्रकल्प शाळेत राबवता येतील.
● प्रत्येक वर्गाच्या बाहेर कचराकुंडी ठेवण्यात यावी.
'स्मार्ट सिटी' घडवायची असेल तर प्रथम 'स्मार्ट विद्यार्थी' घडायला हवा.
हा देश माझा आहे,याचे सर्वांना भान हवे आणि त्यामुळेच त्याला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी माझ्या विद्यार्थ्यांकडून व्हायला हवी.
'स्वच्छ विद्यार्थी,
स्वच्छ शाळा.
स्वच्छ शाळा,
स्वच्छ भारत.
स्वच्छ भारत,
समर्थ भारत.
सौ. प्राजक्ता दशरथ मोहपे
(नूतन विद्यालय,कर्णिक रोड कल्याण )